पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेदांता फॉक्सकॉनवरुन सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं. तो प्रकल्प गेला ना आता कशाला चर्चा करायची, असा सवाल केला. वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जायला नको होता पण तसं झालं आहे. आता तो प्रकल्प महाराष्ट्रात परत येईल, असं वाटत नाही. दुसरा प्रकल्प देण्याच्या चर्चा होत आहेत, तो लहान मुलाला समजवण्यासारखा प्रकार असून महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला शोभणारा नाही, असं शरद पवार म्हणाले.
वेदांता यांच्या जुन्या एका प्रकल्पाचा दाखला देत शरद पवार यांनी जुनी आठवण सांगितली. वेदांतांचा प्रकल्प शेवटपर्यंत येईपर्यंत मला स्वत:ला खात्री वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले. हा प्रकल्प तळेगावला येणार होता, त्याची चर्चा झाली होती. राज्य सरकारनं जे काही आवश्यक आहे त्या निर्णयाची तयारी ठेवली होती. पण नंतर याच्यात बदल झाला, त्याच्यात आता काय फायदा दिसत नाही. काही लोकांनी निर्णय बदलावा असं सांगितलं, महाराष्ट्रात आणावा असं काही जण म्हटले पण तसं होणार नाही. महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर जायला नको होता, बाहेर गेला आहे आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही.
मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दोघांनी पाठीमागच्या सरकारच्या काळात यावर निर्णय घेतला नसल्याचं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरेंचं सरकार जबाबदार आहे, असं ते म्हणाले. मात्र, ठाकरेंच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि उदय सामंत होते. दोघे त्या मंत्रिमंडळात होते मात्र त्यांनी असे आरोप करणे शहाणपणाचं लक्षण नाही, असा सल्ला शरद पवार यांनी लगावला.



