कोल्हापूर : वेदांता प्रकल्प हा महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आला आहे. आता यावरून विरोधकांनी शिंदे, फडणवीस सरकारला चांगलचं कोंडीत पकडलं आहे. वेदांत प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. वेदांता महाराष्ट्रात यावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने खूप प्रयत्न केले होते. मात्र २० दिवसांमध्ये असं काय झालं की हा प्रकल्प थेट गुजरातला गेला असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला आहे.
दुसऱ्या प्रकल्पांना मर्यादा….
पुढे बोलताना जयंत पाटील यांनी म्हटलं की, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याने महाराष्ट्रात होणारी मोठी गुंतवणूक गेली आहे. आता त्याबदल्यात हे देतो ते देतो म्हणून महाराष्ट्राला गाजर दाखवण्यात येत आहे. मात्र दुसऱ्या प्रकल्पांना मर्यादा आहेत.
ज्यांनी राज्यात प्रकल्प आणला होता तेही आता ट्विट करून माहिती देत आहेत. म्हणजे त्यांना जे बोलायला सांगितले आहे तसंच ट्विट त्यांनी केलं आहे. गुजरातमधील तरुणांना सांगण्यासाठीच हा प्रकल्प तिकडे नेला असावा अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. मात्र आता हा प्रकल्प राज्यात आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा आम्ही त्यांना सहकार्य करू असंही पाटील यांनी म्हटलं आहे.



