विजयादशमीनिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्कवर शिवेसेनेकडून दरवर्षी दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईत येतात. मात्र यावर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये चढाओढ सुरू आहे. असे असताना आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने जमा व्हा, असे आदेश दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील विभाग प्रमुखाशी बैठक घेत आगामी दसरा मेळाव्यावर चर्चा केली. यावेळी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. याविषयी बोलताना यावर्षी होणारा दसरा मेळावा विशेष असणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह आहे. मागील दोन महिन्यांपासून राज्यात ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यामुळे राज्यातील आणि मुंबईतील शिवसैनिक चिडून उठलेला आहे. शिवसैनिकांच्या अंगात वेगळे तेज आलेले आहे. मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत अत्यंत संयमाची भूमिका घेतली. आपण जे काम यापूर्वी करत आलो आहोत, तेच काम करायचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.



