चोर समजून रखवालदाराला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील घायरी भागात घडली. टोळक्याने केलेल्या मारहाणीत रखवालदार गंभीर जखमी झाला आहे. टोळके वाढदिवसाची पार्टी मोकळ्या जागेत साजरी करत होते. त्या वेळी तेथे पार्टी पाहत थांबलेल्या रखवालदाराला टोळक्याने चोर समजून मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे.
गणपतसिंह मेरावी (वय ३८ ) असे गंभीर जखमी झालेल्या रखवालदाराचे नाव आहे. याबाबत सुकलसिंह मसराम (वय २५, रा. धायरी ) याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुकलसिंह आणि गणपतसिंह धायरीतील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात राहायला आहेत. रविवारी रात्री टोळक्याने गृहप्रकल्पाशेजारी असलेल्या माेकळ्या जागेत वाढदिवसाचीपार्टी आयोजित केली होती. त्यावेळी टोळक्यातील काही जण नाचत होते. गणपतसिंह तेथे थांबला होता. त्यावेळी गणपतसिंह चोर असल्याचा संशय टोळक्यातील काही जणांना आला. टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली. सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिवे तपास करत आहेत.



