भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती दौऱ्यावर असताना महाविकासआघाडीच्या सत्ताकाळातील कारभारावर टीका केली आहे. महाविकासआघाडीच्या काळात विकास रखडल्याने जनतेमध्ये चीड निर्माण झाली आहे. गावाखेड्यातील कार्यकर्ते महाविकासआघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील विकासकामांची तुलना करत आहेत. यामुळे २०२४ मधील निवडणुकीत महाविकासआघाडीला उमेदवारदेखील मिळणार नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
मराठवाडा, विदर्भाचे वैधानिक विकास महामंडळे महाविकासआघाडी सरकारने बंद केले. त्यामुळे या प्रदेशाचा विकास रखडला आहे. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकारने वैधानिक मंडळांची स्थापना केल्यामुळे विकासाला गती मिळणार आहे”, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. राज्यपालांनी १२ आमदारांची यादी मंजूर केल्यानंतरच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल, या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेवरही यावेळी बावनकुळे यांनी हल्लाबोल केला.



