मुंबई : राज्यात अतिवृष्टीसाठी ठरवण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा देत मदतीची घोषणा केली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपद्ग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेण्यात आली त्यामध्ये ७५५ कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांचेसह वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत विशेष बाब म्हणून ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे ४५०० कोटी रुपयांच्या निधीचे वाटप झाले आहे. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर मदतीचे वाटप केले असते तर ती अवघी १५०० कोटी रुपये राहिली असती, निकषापलिकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.



