मुंबई – तमाम महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या शिवसेनेच्या दोन गटांचे दोन स्वतंत्र दसरा मेळावे बुधवारी मुंबईत झाले. त्या मेळाव्यांना झालेल्या गर्दीविषयी वेगवेगळी आकडेवारी दिली जात आहे. अर्थात, प्राथमिक अंदाजानुसार गर्दी जमवण्यात शिंदे गटाने बाजी मारल्याचे दिसते, पण खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणबाजी खिल्लीचा विषय बनली. त्यामुळे शिंदे गटाने दुसऱ्या मेळाव्यासाठी केलेल्या खटाटोपामागील हेतू साध्य झाला का, हा मोठा प्रश्नच आहे.
ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये शिवसेनेवर दावा सांगण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. त्या राजकीय नाट्याचा अंक म्हणून दसरा मेळाव्यांकडे पाहिले गेले. मेळाव्यांना मोठी गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन करण्याचा चंग दोन्ही गटांनी बांधला. साहजीकच कुठल्या मेळाव्याला गर्दी जमवणे हा विषय कुतूहलाचा बनणे स्वाभाविकच होते. आता मेळाव्यांना झालेली गर्दीची अंदाजे आकडेवारी पुढे येत आहे. विविध प्रसारमाध्यमांनी ती पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजाच्या आधारे दिली आहे. मात्र, त्यातही मोठी तफावत दिसते. शिवाजी पार्कवरील ठाकरे गटाच्या मेळाव्याला ६५ हजार ते १ लाख लोक उपस्थित राहिल्याची आकडेवारी देण्यात आली. तर, शिंदे गटाच्या वांद्रे-कुर्ला संकुल मैदानावरील मेळाव्यासाठी १ लाख २५ हजार ते २ लाख लोक जमल्याचे सांगण्यात आले. नेमकी आकडेवारी समोर येणे तसे अवघड आहे, पण अंदाजे आकडेवारी पाहता शिंदे गटाच्या मेळाव्याला अधिक गर्दी झाल्याचे मानता येईल.
अर्थात, गर्दी जमवण्यात सरशी होऊनही शिंदे गट जनमानसावर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरला का, या प्रश्नाचे उत्तर तूर्त तरी नकारार्थीच येऊ शकेल. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४३ मिनिटे भाषण केले. भाषणाच्या वेळेत शिंदे यांनी ठाकरेंना मात दिली. शिंदे यांचे भाषण तब्बल दीड तास चालले. खरेतर, चालले म्हणण्याऐवजी लांबले असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे भाषणबाजी लांबल्याने गर्दी ओसरली असल्याचे चित्र दिसून आले.



