अहमदाबाद – गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर पाकिस्तानातून चोरट्या मार्गाने आणलेले 350 कोटी रूपयांचे हेरॉईन तटरक्षक दल आणि स्थानिक पोलिसांनी पकडले आहे. पाकिस्तानातून आलेल्या या बोटीवरील सहा जणांनाहीं अटक करण्यात आली आहे. जवानांनी अरबी समुद्रात 50 किलो हेरॉईन असलेली अल सक्कर ही बोटही जप्त केली आहे.
शुक्रवार आणि शनिवारीच्या मध्यरात्री एक पाकिस्तानी बोट संशयास्पदरीत्या भारतीय सागरी हद्दीत फिरताना दिसली, तेव्हा आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेच्या आत 5 नॉटिकल मैल आणि 40 नॉटिकलमध्ये ही संयुक्त कारवाई करण्यात आली. कारवाई होत असल्याचे दिसताच पाकिस्तानी बोटीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला घेरण्यात भारतीय पथकाला यश आले.
बोटीची झडती घेतली असता त्यात पाच गोण्यांमध्ये लपवून ठेवलेले 50 किलो अमली पदार्थ सापडले. जप्त केलेल्या मादक द्रव्याची बाजारातील किंमत अंदाजे 350 कोटी रुपये आहे. गेल्या एका वर्षात आयजीसी आणि राज्य एटीएसची ही सहावी संयुक्त कारवाई आहे. 14 सप्टेंबर रोजी एका पाकिस्तानी बोटीतून 40 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.



