नवी दिल्ली : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचं धनुष्य बाण हे अधिकृत निवडणूक चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
तसंच शिवसेना हे नावही उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यापैकी कुठल्याही गटाला वापरण्यास तूर्तास मनाई करण्यात आली आहे. खरी शिवसेना कुठली, याचा फैसला घेता न आल्यामुळे निवडणूक आयोगाने हा अंतरिम निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. याचा थेट फायदा भाजपला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असून केवळ आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकापुरता मर्यादित आहे. तो निर्णय भविष्यातील निवडणुकांच्या वेळी बदललाही जाऊ शकतो. मात्र तूर्तास उद्धव ठाकरे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. येत्या पोटनिवडणुकीत ठाकरे गट कोणतं चिन्हं निवडणार याची उत्सुकता आहे. मात्र हा निर्णय भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोटनिवडणुकीत अधिक रंगत निर्माण झाली आहे.



