मुंबई – शिवसेनेच्या ठाकरे गटाने स्वतंत्र दसरा मेळावा घेणाऱ्या शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच, त्या मेळाव्यासाठी ५० ते १०० कोटी रुपये इतका खर्च झाला असावा, असा दावाही केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून ठाकरे गटाने शिंदे गटाच्या मेळाव्यावर जोरदार शाद्विक बाण सोडले आहेत. मुंबईत गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाने २ हजार एसटी बस बुक केल्या. त्यासाठी १० कोटी रुपये रोखीत भरण्यात आले.
ती रक्कम एसटी कर्मचारी तीन दिवस मोजत होते. त्याशिवाय, २ लाख लोकांना पंगत दिली गेली. एकंदरीत, मेळाव्यासाठी दोन आमदार विकत घेण्याइतका पन्नास-शंभर खोके (कोटी रुपये) इतका खर्च झाला असावा, असा अंदाज अग्रलेखातून वर्तवण्यात आला आहे.
सध्या भाजपने एक इव्हेन्ट युग आपल्या देशात आणले आहे. शिंदे गटाचा मेळावा भाजप पुरस्कृत इव्हेन्टच होता. फॅशन शो, सौंदर्य स्पर्धेसारखा तो सोहळा होता. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण म्हणजे मोदी-शहा चालिसाचे वाचनच होते. भाजपनेच त्या इव्हेन्टची कथा पटकथा लिहिली होती, अशी शाद्विक टोलेबाजीही अग्रलेखातून करण्यात आली. या मुद्दयावर शिंदे गटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.



