मुंबईः निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह दिलेलं आहे. तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावाला मंजुरी दिली. होऊ घातलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी हे नाव आणि हे चिन्ह वापरता येईल.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाची इतर चिन्हं नाकारली. त्याची कारणंदेखील दिलेली आहे. ‘त्रिशुळ’ या चिन्हामध्ये धार्मिक अर्थ असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे. 1968च्या आदेशानुसार परिच्छेद 10(B)(A)(iv) मधील तरतूदीनुसार धार्मिक अर्थ असलेली चिन्हं देता येत नाही. याशिवाय चिन्हांमध्ये पक्षी अथवा प्राणी यांची प्रतिकृती असेल तर असेही चिन्ह देता येत नसल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
उगवता सूर्य’ हे चिन्हही नाकारण्यात आलेलं आहे. कारण तामिळनाडू आणि पाँडेचेरी येथील द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाचं हे चिन्ह आहे. १९६८च्या परिच्छेद ९मधील तरतुदीनुसार अशा प्रकारे पुन्हा चिन्ह देता येत नाही. त्यामुळे उगवता सूर्य हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाला देता आलेले नाही.’धगधगती मशाल’ हे चिन्ह ठाकरे गटाला मिळालेले आहे. पूर्वी हे चिन्ह समता पार्टीचं होतं. परंतु २००४ मध्ये या पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली. हे चिन्ह ‘फ्री सिम्बॉल्स’च्या यादीत नाही. मात्र सध्याच्या पोटनिवडणुकीमध्ये ते वापरता येईल, असे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.



