पुणे : पुण्यात एका व्यावसायिकाचे २० कोटींसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुण व्यावसायिकाकडून २० कोटी रुपयांची खंडणी मागून त्याचे अपहरण करण्यात आले. या व्यावसायिकाची पोलिसांनी सुखरुप सुटका केली असून कुख्यात गजा मारणे आणि टोळीवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खंडणी व अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणी ३३ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार हेमंत पाटील, फिरोज तात्या, अमर किरदत्त, पप्पू घोलप, गजा मारणे, रुपेश मारणे, एक महिला तसेच इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर मार्केटमधील व्यवहारातील पैशांवरुन अपहरण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार यांची शेअर मार्केट व्यवहाराची कंपनी आहे. या कंपनीत हेमंत पाटील यांनी चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तक्रारदार यांची कंपनी डबघाईला आल्याने परतावा देता आला नाही. पाटील याने वारंवार चार कोटींच्या बदल्यात २० कोटींची मागणी केली. थोड्या दिवसात चार कोटी रुपये देतो किंवा जमीन नावे करून देतो, असे तक्रारदाराने सांगितले.




