बीड – मराठा आरक्षण हवे आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपवत असल्याचा चिठ्ठीत उल्लेख करत बीडमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बीडमधील शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये आत्महत्या का करत आहे याचे कारण लिहिले आहे. मी माझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करू शकत नाही. खर्च करूनही मराठा समाजातील मुलांना नोकरीसुद्धा मिळत नाही. मराठा आरक्षण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठी लिहीत आत्महत्या केली आहे.
मराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकरीत १६ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभर सकल मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन केले. विशेष म्हणजे इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या टक्केवारीला हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्याची अहवालात शिफारस आहे. त्यामुळे हा अहवाल स्वीकारला गेल्यास राज्यातील आरक्षणाची टक्केवारी ६८ टक्के इतकी होईल.



