ठाणे : दसरा मेळाव्यावरून रंगलेल्या रस्सीखेच नंतर आता ठाण्यात दिवाळी पहाटसाठी शिमगा होणार आहे. कारण, डॉ. मुस रोडवर दिवाळी पहाट करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात फटाक्यांचे बार उडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यंदा सांस्कृतिक मेजवानीसह राजकीय गोंधळही ठाणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. डॉ. मुस रोडवर राजन विचारे गेले १० वर्षे दिवाळी पहाट आयोजित करत आहेत. मात्र, यंदा शिंदे गटाने दिवाळी पहाटसाठी दोन्ही गटाने परवानगीसाठी अर्ज केला आहे. आम्ही आधी परवानगी मागितल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे, तर आम्ही प्रथम महापालिका आणि पोलिसांना पत्र दिल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे दोन्ही गटापैकी कोणाला परवानगी मिळते याकडे संपूर्ण ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
राजन विचारे यांच्यामार्फत नितीन लांडगे कार्यक्रमाकरता पत्र पाठवले जाते. गेल्या दहा वर्षांपासून तेच पत्रव्यवहार करतात. मात्र, यंदा ते शिंदे गटात सामील झाल्याने त्यांनी शिंदे गटाकडून पत्र पाठवले आहे. यंदा १९ सप्टेंबर रोजी पालिका आणि पोलिसांकडे परवानगी आणि त्यांनी ती दिली. एवढंच नव्हे तर, चिंतामणी चौकातील जागेवरदेखील त्यांनी परवानगी मागितली आहे. तर, दुसरीकडे पालिकेने आम्हाला देखील त्याच ठिकाणी परवानगी दिली असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. डॉ. मुस रोडसाठी ठाकरे गटाने परवानगी मागितलीच नसल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.



