पुणे : भाजपाने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला असून, ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर घडामोडींना वेग आला होता. त्यानंतर आज अखेर भाजपाने निवडणूक न लढवण्याचं जाहीर केलं.
मात्र राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांचा 3,503 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांच्या मुलाचा भागीरथ भालके यांचा पराभव केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी कारभाराला आरसा दाखवण्याचं काम पंढरपूरच्या जनतेनं केल असा आरोप केला होता.
आता राज्यात महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार करून सत्तेत सहभागी झालेल्या भाजप पक्षाला अंधेरी निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून महाविकास आघाडीलास राज्यातून पायउतार केल्याचे हमी जनतेला देता आली असती. मात्र त्यांनी नेमका या निवडणुकीतून काढता पाय घेतला याची उलट सुलट चर्चा सध्या राज्यात सुरू झाली.



