मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठं नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राज्यभरातून होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अजितदादांच्या भेटीनंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असे आदेश दिले आहेत. मात्र अजून ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असं अजब विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तसंच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंचनामे आणि भरपाईचे आदेश दिले. मात्र राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असं विधान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. ज्या भागात नुकसान झालं आणि त्या भागाचे पंचनामे केल्यावर किती नुकसान झालं ते समजेल, असंही सत्तार म्हणाले.



