पुरंदर : पुरंदर तालुक्याला विकासाचे स्वप्न दाखवून सात गावांवर अन्याय करून हुकूमशाही पद्धतीने विमानतळ लादण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. तसेच मानसिक खच्चीकरण करून आमची मुळे छाटण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. दिशाभूल करून जमिनी लाटल्या तर भविष्यात गडचिरोली प्रमाणे पुरंदरमधील सात गावांतही नक्षली हालचाली तयार होऊ शकतात, असे कडक इशारा विमानतळामुळे बाधित होणाऱ्या सात गावांतील नागरिकांनी दिला आहे.
पारगाव, खानवडी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, वनपुरी या गावांमध्ये प्रस्थापित विमानतळ नियोजित आहे; परंतु काही बड्या नेत्यांच्या स्वार्थापोटी हे विमानतळ आमच्यावर लादले जात आहे. फक्त शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन विमानतलाचा निर्णय घेतला जाईल, असे म्हटले जात आहे. पण गेल्या सहा वर्षांत कोणताच प्रशासकीय अधिकारी आम्हाला भेटायाला फिरकला नाही तर आम्हाला विश्वासात घेणार कधी, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. दरम्यान, सरकारच्या म्हणण्यानुसार या भागात जिरायती क्षेत्र अधिक आहे. आम्हाला आमच्याच गावातील जिरायती क्षेत्र दाखवा नक्की आहे. तरी कुठे? तसेच हे सरकार हे शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे सरकार नाही हुकूमशाही पद्धतीने विमानतळाबाबतचे निर्णय घेतले गेले आहेत.
आमचा अजूनही लोकशाहीवर विश्वास आहे. शेवटपर्यंत लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आमचे गाऱ्हाणे सरकार पुढे मांडणार आहे. तसेच सरकारने याबाबत योग्य निर्णय घेत कार्यवाही करण्याची गरज आहे. यामध्ये काही लोकांचे बळीही जाणार आहेत. यास सर्वस्वी हुकूमशाही सरकार जबाबदार असेल, अशी तीव्र भावना यावेळी सात गावांतील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.



