अहमदाबाद – भाजपचे माजी आमदार आणि बडोद्यातील भाजप नेते बाळकृष्ण पटेल यांनी रविवारी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश ठाकोर आणि माजी अध्यक्ष सिद्धार्थ पटेल यांनी पक्षाच्या मुख्यालयात बाळकृष्ण पटेल यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.
बाळकृष्ण पटेल तिकीट यांनी २०१२ ते २०१७ दरम्यान वडोदरा जिल्ह्यातील दाभोई मतदारसंघाचे भाजपचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. २०१२ मध्ये ते काँग्रेसचे सिद्धार्थ पटेल यांचा पराभव करून आमदार बनले होते. काँग्रेस प्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जिल्हा आणि तालुका पातळीवर भाजपला बळकट करण्यासाठी आम्ही अनेक वर्षे मेहनत घेतली होती. मी विद्यमान आमदार असतानाही मला २०१७ च्या निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले नव्हते. माझ्या मुलालाही नाकारण्यात आले होते. भाजप श्रेष्ठींनी सातत्याने अन्याय केल्याने आपण भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. काँग्रेसकडून आपल्याला किंवा मुलाला तिकीटाची अपेक्षा नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.



