मुंबईः आमदार रवी राणांचे आरोप, बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीसांसह राणांना दिलेलं आव्हान आणि आगामी मंत्रिमंडळ विस्तार या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात प्रचंड राजकीय हालचाली सुरु आहेत. पडद्यावर दिसणाऱ्या प्रतिक्रियांतून एकमेकांबद्दल राग, नाराजी, धुसपूस दिसूनच येतेय. मात्र पडद्यामागेदेखील प्रचंड राजकीय खलबतं सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच घडामोडींमध्ये आज आणखी एक घडामोड म्हणजे शिंदे गटातील आमदार आणि खासदार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
शिंदे गटातील आमदार आणि खासदारांना X वरून Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेतही ही वाढ झाली आहे. राहुल शेवाळे यांच्यासह 11 खासदार तसेच 41 आमदारांसाठी पोलीस कर्मचारी आणि पोलीस व्हॅनची सुरक्षा अधिक देण्यात आली आहे.
याच राजकीय हालचालींमध्ये एकनाथ शिंदे गटाचे आमदार पुन्हा एकदा गुवाहटीला जाण्याची चर्चा आहे. तर काहीजण अयोध्येलाही जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.



