मुंबई : शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीनंतर उद्धव ठाकरे गटात आता जोरदार हालचाली सुरू झाल्यात. आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटानं आतापासूनच जय्यत तयारी सुरू केलीय. बंडखोरांना पाणी पाजण्यासाठी ठाकरेंनी काय व्यूहरचना आखली आहे.
मातोश्रीवर पुढचे 14 दिवस मॅरेथॉन बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. राज्यभरातील ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बैठका मातोश्रीवर होणार आहेत. आजी-माजी आमदार-खासदारांनाही या बैठकीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. आगामी BMC महापालिका तसंच 2024 च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांची व्यूहरचना आखण्यास ठाकरे गटानं आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
बंडखोरांना पाणी पाजण्यासाठी ‘प्लॅन बी’?
उद्धव ठाकरेंची साथ सोडून 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. या बंडखोर खासदारांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी ठाकरे गटानं कंबर कसल्याचं समजतंय. मातोश्रीवरील बैठकांमध्ये संभाव्य तगड्या उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महाविकास आघाडीनं एकत्रित निवडणुका लढवल्या आणि या 12 जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्या तर बंडखोर खासदारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंसाठी 50 आमदार आणि 12 खासदारांनी एकाचवेळी पक्ष सोडून जाणं हा मोठा धक्का होता. या राजकीय भूकंपातून ठाकरे गट आता सावरू लागलाय. मातोश्रीवर सुरू झालेल्या जोरबैठका आणि ठाकरे गटाचं प्लॅनिंग हे त्याचंच उदाहरण.



