रांची : प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी झारखंडमधील काँग्रेसच्या दोन आमदारांच्या ठिकाणांवर छापे टाकले. त्या छाप्यांवेळी एका अधिकाऱ्याला भाजपने वाहन उपलब्ध केल्याचा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला. करचुकवेगिरीच्या आरोपावरून काँग्रेसचे दोन आमदार प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले आहेत.
त्या विभागाने छापासत्र राबवल्यावर सोरेन यांनी ट्विटरवरून भाजपला घेरले. इतरांना नीतिमत्ता शिकवणाऱ्यांनी (भाजप) स्वतःचे तोंड काळे करून घेतले आहे. इतरांना धडे देणारे विरोधात असणाऱ्या नेत्यांना समन्स बजावतात. पण, मोरबी पूल दुर्घटनेमुळे गुजरात मॉडेलचे सत्य सर्वांसमोर आले आहे.
त्या दुर्घटनेनंतर गुजरातमधील संबंधित मंत्र्याने राजीनामा का दिला नाही, असा सवालही सोरेन यांनी केला. आमचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण, आम्हाला चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही, असेही त्यांनी म्हटले.. झारखंडमधील आघाडी सरकारचे नेतृत्व सोरेन करतात. त्या आघाडीत झामुमो, काँग्रेस आणि राजद या पक्षांचा समावेश आहे..



