मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येत असून त्या यात्रेत राहुल गांधी यांच्याबरोबर कित्येक किमीचे अंतर पायी चालावे लागणार असल्याने राज्यातील बहुतांश काँग्रेस नेत्यांना आधीपासूनच घाम फुटला असावा. त्यासाठी अनेकांनी आधीपासूनच चालण्याची प्रॅक्टीस सुरू केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधींची कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा ८ नोव्हेंबर रोजी तेलंगाणा राज्यातून महाराष्ट्रात दाखल होत आहे. केरळ, कर्नाटक व तेलंगाणात लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात प्रवेश करत आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून जोरदार तयारी केली जात आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ८ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील ठराविक जिल्ह्यातून जाणार आहे.त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पदयात्रेत राहुल गांधींच्या बरोबरीने चालता यावे म्हणून सध्या जोरात सराव करीत आहेत. नाना पटोले अन्य काँग्रेस नेत्यांबरोबरदररोज ‘मॉर्निंग वॉक’ करत आहेत. त्यासोबतच भारत जोडो यात्रेचा जिल्हास्तरावर आढावा घेतला जात आहे. भारत जोडो यात्रा तयारीच्या आढाव्यासाठी नानापटोले शनिवार आणि रविवार असे दोन दिवस यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.
नाना पटोले रविवारी ६ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता यवतमाळच्या जिल्हा क्रीडा संकुलात मॉर्निंग वॉक करणार आहेत. यानिमित्त काँग्रेस पदाधिकारीही चालण्याचा सराव करत आहेत. शनिवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात भारत जोडो यात्रेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत नाना पटोले मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी सकाळी ५ वाजता येथील जिल्हा क्रीडा संकुलात मॉर्निंग वॉक झाल्यानंतर १० वाजता भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आयोजित बाईक रॅलीत ते सहभागी होणार आहेत. नांदेड येथे दाखल होणाऱ्या भारत जोडो यात्रेत यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्याची जय्यत तयारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सध्या सुरू आहे.
भारत जोडो यात्रेच्या नियोजनाची आणि प्रसिद्धीची जबाबदारी सतेज पाटलांकडे..
महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेच्या नियोजनाची आणि प्रसिद्धीची जबाबदारी माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते सतेज पाटलांकडे देण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील असंख्य कॉंग्रेसचे यात्रेच्या नियोजनासाठी तयारी करत असल्याचं समजतं. सोशल मीडियावरही यात्रेचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार केला जात आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही यात्रेला पाठिंबा…
कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार यांच्यासह एनसीपीचे अनेक आमदार सहभागी होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय उद्धव ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे आणि खासदार अरविंद सावंत हे देखील भारत जोडो यात्रेत सामील होण्याची शक्यता आहे.


