नवी दिल्ली – दिल्लीतील धोकादायक प्रदूषण पातळीमुळे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी शुक्रवारी दिल्ली सरकारच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले. अन्य खासगी कार्यालयांनाही अशाच स्वरूपाची उपायोजना करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शनिवारपासून याच कारणासाठी दिल्लीतील प्राथमिक शाळाही बंद ठेवल्या आहेत. वाईट हवेत विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.
राय म्हणाले की, दिल्ली सरकारने हवा गुणवत्त व्यवस्थापन आयोगाने शिफारस केलेल्या प्रदूषण विरोधी प्रतिबंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात बीएस सहा हे मानांकन नसलेल्या डिझेल वर चालणाऱ्या हलक्या मोटार वाहनांवर बंदी घातली जाणार आहे. सार्वजनिक वाहतूक वाढवण्याच प्रयत्नात सरकार परिवर्तन बस सेवा’ देखील सुरू करणार आहे. ज्यात ५०० खासगीरित्या गाड्या चालवल्या जाणाऱ्या सीएनजी बसेसचा समावेश असेल.




