मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार आहे. त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. मला एकनाथ शिंदे यांनी राजकारणात आणलं. ते जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारेल. लवकरच माझा शिंदे गटात प्रवेश होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मात्र, दिपाली सय्यद यांना शिंदे गटात घेण्यासाठी भाजपच्या महिला आघाडीने विरोध दर्शवला आहे. दिपाली सय्यद यांनी आधी भाजपाची बिनशर्त माफी मागावी, खोट्या तक्रारी मागे घ्याव्यात, त्यानंतरच त्यांना शिंदे गटात प्रवेश द्यावा, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या जनरल सेक्रेटरी दिपाली मोकाशी यांनी केली आहे.
कथाकथित स्वयंभू नेत्या दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी वाचली. त्यांना सुबुध्दी येण्यास फारच उशीर झाला. पण हरकत नाही. असा टोला मोकाशी यांनी लगावला आहे. त्याचबरोबर, सय्यद यांनी याआधी प्रसिद्धीपोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्यारितीने आक्षेपार्ह आणि खालच्या शब्दात टीका केली होती. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणाऱ्या भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात खोट्या तक्रारी दिल्या होत्या. या सर्व गोष्टींसाठी सय्यद यांनी भाजपची माफी मागावी, असं मोकाशी यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर, सय्यद यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाल्यामुळेच त्या शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्या. आता त्यांनी झालं गेलं विसरून बिनशर्तपणे पंतप्रधान, उपमुख्यमंत्र्यांची माफी मागावी. तसेच महिला मोर्चातील पदाधिकाऱ्यांवरील तक्रारी मागे घ्याव्यात, अन्यथा त्यांच्या पक्षप्रवेशाला आमचा विरोध असेल, असे मोकाशी यांनी ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे आता दिपाली सय्यद माफी मागतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, शिंदे गटात प्रवेश करण्यापुर्वी दिपाली सय्यद यांनी थेट रश्मी ठाकरे यांच्यावरही टिका केली. ” मुंबई महानगर पालिकेतील खोके मातोश्रीवर जाणे बंद झाल्याचे सर्वात जास्त दु:ख रश्मी वहिनींना आहे. तर नीलम गोऱ्हे आणि सुषमा अंधारे हे चिल्लर लोक आहेत. या सर्वांचा जो सर्वात मोठा दुवा आहे तो रश्मी वहिनी आहेत, अशी टीका दिपाली सदृय्यद यांनी केली आहे. याचवेळी त्यांनी खासदास संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो. याचं संजय राऊत हे उत्तम उदाहरण आहे. अस सय्यद यांनी म्हटलं आहे. .



