कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात तिसऱ्या दिवशी आज शुक्रवारी मावळत्या सूर्यकिरणांनी अंबाबाई मूर्तीच्या चेहऱ्याला स्पर्श केला. श्री अंबाबाईचा वर्षातून दोनदा किरणोत्सव सोहळा पार पडत असतो. या सोहळ्यात मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात प्रवेश करतात. प्रवासाचा एक एक टप्पा पार करत पहिल्या दिवशी किरणे अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श करतात. दुसऱ्यादिवशी कमरेपर्यंत आणि तिसऱ्या दिवशी ही किरणं चेहऱ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण होतो.

सायंकाळी ४ वाजून ५९ मिनिटांनी सूर्यकिरणे महाद्वारातून मंदिरात आली आणि ५ वाजून ४४ मिनिटांनी किरणांनी अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श केले आणि ५ वाजून ४६ मिनिटांनी किरणांनी देवीच्या कंबरेला स्पर्श करत ५ वाजून ४७ मिनिटांनी सूर्याची किरणे श्री अंबाबाई च्या गळ्याला स्पर्श करत ठीक ५ वाजून ४८ मिनिटांनी सूर्य किरण हे देवीच्या चेहऱ्यावर आले आणि लुप्त झाली. यानंतर देवीची आरती करण्यात आली आणि श्री अंबाबाई देवीची अलंकार पूजा करण्यात आली. यावेळी किरणोत्सव पाहण्यासाठी मंदिर आवारामध्ये सीसीटीव्ही नियंत्रकक्ष यांच्या लाईव्ह कॅमेऱ्याच्या सोर्स मधून किरणोत्सवाचे थेट प्रक्षेपण एलईडी स्क्रीनवर देण्यात आला होता.



