पुणे, दि. 11 – साखर कारखान्यांकडून ऊसाच्या वजनात काटमारी, खासगी आणि कारखान्यांच्या वजन काट्यातील फरक टाळण्यासाठी आता साखर आयुक्तालयाने साखर कारखान्यांसाठी एकच संगणकीकृत प्रणाली राबविण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच खासगी तसेच साखर कारखान्यांचे वजन काटे हे दोन्ही ही वैधमापन शास्त्र विभागाकडून प्रमाणित केलेले वजन काटे असल्यामुळे त्यावरील वजन ग्राह्य धरणे अपेक्षित आहे, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले.
साखर कारखान्यांच्या गाळप हंगामापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हा तसेच तालुकास्तरवर कारखान्यांच्या वजनकाट्यांची भरारी पथकांमार्फत तपासणी करण्यात येते. तरीही कारखान्यांकडून ऊसाच्या वजनात काटामारी केली जाते. शेतकऱ्यांना ऊसाच्या वजनाची अचूक नोंद तत्काळ मिळत नाही. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या ऊस वजनात पारदर्शकता दिसून येत नाही अशा प्रकारे वजनात काटामारी करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान साखर कारखाने करीत असल्याच्या तक्रारी राज्यातील विविध कारखान्यांकडून साखर आयुक्तालयास करण्यात आल्या होत्या.
शेतकऱ्यांच्या तक्रारीचे गांभीर्य पाहता साखर आयुक्तालयाने कारखान्यांच्या वजनकाट्यांच्या कॅलिब्रेशनमध्ये एकसमानता, सूसुत्रता तसेच पारदर्शकता राहण्यासाठी सर्व वजन काट्यांची एकच संगणकीकृत प्रणाली कार्यान्वित असावी. तसेच त्याचे कॅलिब्रेशन नियंत्रण वैद्यमापन शास्त्र विभागाकडून व्हावे यासाठी आवश्यक कार्यवाहीसाठी साखर आयुक्तालयाने प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने साखर आयुक्तालयाने सर्व साखर कारखान्यांच्या वजन काट्यासंदर्भात निर्णय घेत सर्वच कारखान्यांमध्ये संगणकीकृत वजनकाटे कार्यान्वित करण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे आता शेतकऱ्यांची फसवणूक टळेल. तसेच त्यांच्या ऊसाच्या वजनाची नोंद तत्काळ मिळणे शक्य होईल. याबाबत आयुक्तालयाने परिपत्रक जारी केले आहे.



