मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. विशेष म्हणजे शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे.
विशेष म्हणजे शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. काही कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला तर काहींनी शिंदे गटाला पाठिंबा दिलाय. पण शिवसेनेच्या या दोन गटांची लढाई आता घरा-घरापर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे अभिनेते नाना पाटेकर यांनी हेच विधान एका कार्यक्रमात केलं होतं. त्यानंतर आज तसंच काहीसं दृश्य बघायला मिळतंय. कारण शिवसेनेचे दिग्गज नेते गजानन कीर्तीकर आणि त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांच्यात खरी शिवसेना कुणाची? यावरुन मतभेद असल्याचं स्पष्ट झालंय.
गजानन कीर्तिकर जरी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात गेले असले तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे गटात उपनेते या पदावर आहेत. गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी म्हटलं की, हा माझ्या वडिलांचा वैयक्तिक निर्णय आहे. मी मात्र शेवटपर्यंत आदित्य ठाकरे यांच्यासोबतच राहील, असे अमोल कीर्तिकर यांनी सांगितले आहे.
शिवसेनेचे जुने-जाणते नेते, खासदार गजानन कीर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. गजानन कीर्तीकर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुने सहकारी आहेत. त्यांचं शिंदे गटात जाण्याने ठाकरे गटाचं वैयक्तिक मोठं नुकसान झालंय. कारण त्यांचा राजकीय अनुभव हा ठाकरे गटासाठी महत्त्वाचा होता.
गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर म्हटलं की, रवींद्र नाट्य मंदिरात हा ऐतिहासिक क्षण आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाले. आज मी शिंदे साहेबांसोबत जात आहे. गेले अडीच वर्षाचे महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे सरकार ठाकरेंचे होते पण चालवत पवार होते. प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक प्रशासन शिवसैनिकांना जुमानत नव्हते. मी ज्येष्ठ असून देखील विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांना मोठी पद दिली. अखेर सर्वांनी बोलून एकनाथ शिंदे सोबत जाण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंचा काँग्रेससोबतचा पुढचा प्रवास खडतर आहे त्यामुळे शिवसैनिकांनी उठाव करणं गरजेचं आहे. उद्धवजींनी चुकीच्या माणसांना बाजूला घेतलं. त्यामुळे आज मीही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आलो आहे, असं गजानन कीर्तिकर म्हणाले.
गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांचा शिंदे यांना पाठिंबा हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. कारण, पुढील काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी आणखी एक खासदाराने पक्ष सोडणं, पक्षासाठी घातक ठरू शकते.



