चाकण : खेड तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे व सखाराम मलीभाऊ गोरे या तालुक्यातील सर्वांत मोठ्या परिवारातील व एकत्र कुटुंबातील जमीन वाटपाचा वाद ५० वर्षे प्रलंबित होता. राजगुरुनगर न्यायालयात शनिवारी (दि. १२) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये हा खटला तडजोडीने मिटविण्यात यश आले.
राजगुरुनगर येथील मुख्य अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. राजूरकर, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका दिवाणी न्यायाधीश जे. व्ही. म्हस्के व अॅड. अजय पडवळ यांच्या पॅनलमध्ये हा वाद तडजोडीने मिटविण्यात आला. वादीचे वकील म्हणून अॅड. बाळासाहेब लिंभोरे पाटील, तर प्रतिवादीचे वकील म्हणून अॅड. गौरव सांडभोर यांनी कामकाज पाहिले. खेड तालुक्यातील सर्व क्षेत्रांत नावाजलेल्या व एका मोठ्या परिवारातील वाद मिटल्यानंतर वादी प्रतिवादींनी एकमेकांना पेढे भरवून तसेच एकमेकांना आलिंगन देऊन कायमची कटुता संपवली.
यावेळी वादी प्रतिवादींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले व नव्याने बंधुभाव, भावकी – गावकी, नातीगोती पुन्हा जुळली. दरम्यान, आजच्या लोकअदालतीचे उद्घाटन करताना राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांनी मार्गदर्शन करताना कोर्टामधील वर्षानुवर्षे चालणारे खटले, आपापसातील वाद याबरोबरच मनातले हेवेदावे मिटवा, आपल्या परिवारात लोकशाही नांदेल, असे आवाहन केले.
यावेळी न्यायाधीश ए. एम. अंबाळकर, न्यायाधीश एस. एस. पाखले, न्यायाधीश डी. ” बी. पतंगे, न्यायाधीश पी. ए. जगदाळे, न्यायाधीश पी. एस. इंगळे, न्यायाधीश श्रीमती आर, डी, पतंगे- इंगळे, न्यायाधीश श्रीमती जे. व्ही. म्हस्के, खेड वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नवनाथ गावडे, उपाध्यक्ष अॅड. संतोष दाते उपस्थित होते. प्रास्ताविक बारचे अध्यक्ष अॅड. नवनाथ गावडे यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. रश्मी वाघोले यांनी केले. प्रवीण पडवळ यांनी आभार मानले.




