नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे कमी होत असूनही भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा दर २५५ रुपयांनी वाढून ५२,८५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर ५६१ रुपयांनी वाढून ६२,४४० रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर १,७६३ डॉलर व चांदीचा दर २१.६९ डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.
जागतिक बाजारात सोन्याचे
दर कमी होण्याचे कारण स्पष्ट करताना मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, अमेरिकेतील महागाई कमी होण्याची शक्यता असल्यामुळे गेल्या आठवड्यात सोन्याचे दर वाढले होते. मात्र दरम्यानच्या काळामध्ये फेडरल रिझर्व्हच्या काही अधिकाऱ्यांनी अमेरिका व्याजदरात वाढ करीत राहणार असल्याचे सूचित केले.
त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचा दर काही प्रमाणात कमी झाला. अमेरिकेचे पतधोरण जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक विनय राजानी यांनी सांगितले की, महागाई काही प्रमाणात कमी झाली असली तरी फेडरल रिझर्व्ह महागाई आणखी कमी करण्यासाठी आक्रमक पतधोरण राबविणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.. सध्या अमेरिकेतील महागाई ७% पेक्षा जास्त आहे. ही महागाई दोन टक्क्यापर्यंत आणण्याचा संकल्प अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेने अनेक वेळा जाहीर केला आहे. त्यामुळे आगामी काही काळ तरी याचा सोन्याच्या दरावर परिणाम होणार आहे.


