कोल्हापूर : नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं निलेश आणि नितेश हे अनेकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राणे पिता-पुत्रांनी अनेकदा उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या घडामोडींनंतर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर टीकास्र सोडलं आहे.
कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत बोलताना सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्या दोन मुलांचा उल्लेख ‘बारकी बारकी पोरं’ असा केला आहे. त्यांनी केलेल्या खोचक टोमणेबाजीमुळे व्यासपीठावर एकच हशा पिकला होता. दरम्यान, त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची महिलांबद्दल असलेल्या मानसिकतेवरूनही टीका केली. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांवर देवेंद्र फडणवीस काहीच कारवाई करत नाहीत, असंही त्यांनी म्हटलं.
नारायण राणेंची जी दोन बारकी-बारकी पोरं आहेत, त्यांनी अनेकदा मातोश्रीवर टीका केली. मी बारक्या लेकरांबद्दल फार काही बोलत नसते. अजिबात बोलत नसते. पण ती जी दोन बारकी-बारकी लेकरं आहेत ना… त्यांनी उंची नसताना मातोश्रीवर गरळ ओकली आहे. मी त्यांच्या बौद्धिक उंचीबद्दल बोलतेय. पण देवेंद्र फडणवीसांची त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत झाली नाही अशी टीका अंधारे यांनी केली.



