हैदराबाद : प्रो-कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी झालेल्या लढतीत पुणेरी पलटणने हरियाणा स्टिलर्सचा ४१ २८ असा दारुण पराभव केला.. या विजयाच्या जोरावर पुणेरी संघाने स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. संघाच्या विजयात मोलाचा वाटा अस्लम इनामदारने उचलला.
या सामन्यात पहिल्या सत्रापासूनच पुणेरी संघाने वर्चस्व राखले होते. अस्लमने हरियाणाचा बचाव कमकुवत ठरवताना सातत्याने लोण चढवले. अस्लमसह मोगित गोयात यानेही १० गुणांची कमाई केली. हरियाणाकडून प्रपंजनने ८ गुण मिळवताना चांगली लढत दिली. मात्र, त्यांचा सांघिक खेळ अपयशी ठरल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेची पुण्याची फेरी पार पडली असून, आता शुक्रवारपासून साखळी फेरीतील पुढील सामने हैदराबादमधील गच्चीबाऊली स्टेडियममध्ये
सुरू झाले. स्पर्धेचा हा सातवा आठवडा असून आणखी तीन आठवडे ही स्पर्धा सुरू राहणार आहे. स्पर्धेचा सातवा, आठवा, नववा व दहावा आठवडाही हैदराबादमध्येच होणार आहे. स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने १५ डिसेंबरला होणार आहेत, तर अंतिम सामना १७ डिसेंबरला होणार आहे.
पुणेरी पलटण संघाने यंदाच्या मोसमात सातत्याने सरस कामगिरी केली आहे. त्यांचा स्टार खेळाडू अस्लम इनामदारने प्रत्येक संघाविरुद्ध मोलाची कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिले आहेत.


