पुणे : भारतीय कुराश संघटनेतर्फे येत्या २३ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत बालेवाडी येथील क्रीडा संकुलात होत असलेल्या १३ व्या आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
एकूण ६५ देशांतून ५०० पेक्षा अधिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. भारतीय संघात महाराष्ट्रातून चार खेळाडूंचा समावेश झाला असून, आदित्य धोपगावकर (अहमदनगर), गौतमी कांचन (पुणे), स्नेहल खावरे (पुणे), गणेश लांडगे (अहमदनगर) हे महाराष्ट्रातील चौघे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय कुराश असोसिएशन व ऑलिम्पिक संघटनेच्या मान्यतेने होत असून, भारतात कुराश या खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याची ही चौथी वेळ आहे…
भारतीय कुराश संघटनेचे चीफ पॅट्रोन जगदीश टायटलर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी भारतीय कुराश संघटनेचे अध्यक्ष रमेश पोपली, सचिव लालसिंग, खजिनदार धर्मेंद्र मल्होत्रा, स्पर्धेच्या प्रमुख संयोजिका डॉ. स्मिता निकम, राज्य संघटनेचे अध्यक्ष अंकुश नगरे, संतोष चोरमुले, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे शिवाजी साळुंखे, वन की इव्हेंट्स अँड ओके सर सिक्युरिटी अँड बाउंसर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.


