पुणे : चांदणी चौक उड्डाणपूल आणि रस्ता रूंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, या कामामध्ये अनेक ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? दुर्घटना घडल्यावर “एनएचएआय’ जागी होणार का? असा प्रश्न उपस्थित होतो.
एनडीए चौकातील उड्डाणपूल पाडल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या लेन वाढविण्याचे काम गतीने सुरू आहे, त्यासाठी वेळोवेळी ब्लास्टिंग करून खडक फोडला जात आहे. त्यामध्ये कामगारांच्या “सेफ्टिच्या’ दृष्टीने डोक्यावर हेल्मेट, जॅकेट आहे. मात्र, काही कामाच्या ठिकाणी कामगार हे सेफ्टिविनाच काम करीत असल्याचे दिसून येते.
मंगळवारी (दि. 22) चौकातील रस्त्याच्या एका बाजूला तीन कामगार कामानिमित्त खडक असलेल्या टेकडीवर चाढल्याचे दिसून आले, त्यातील दोन कामगार धोकादायक पद्घतीने त्याठिकाणी कामानिमित्त हालचाली करीत होते. सुदैवाने दुर्घटना घडली नाही, परंतू, कामगाराचा पाय घसरून किंवा तोल जावून दुर्घटना घडल्यावर जबाबदार कोण? असली जीवघेणी कसरत कशासाठी. याबाबत एनएचएआयने कामगारांच्या सेफ्टीबाबत गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक आहे.
जीवितहानी होण्याचा धोका…
चांदणी चौकात दररोज शेकडो कामगार काम करीत असतात, त्यातील काही कामगारांकडे सेफ्टीच्या दृष्टीने केवळ हेल्मेट आणि जॅकेट असते. परंतु, काही कामगार विना हेल्मेट असतात. सध्या, टेकडी फोडल्यावर रस्त्याकडेला मोठ-मोठे दगड आहेत. एखादा कामगाराचा तोल जाऊन खाली पडला तरी जीवितहानी होण्याचा धोका आहे, त्यामुळे कामगारांच्या सेफ्टीकडे लक्ष ठेवून, दुर्लक्ष करणाऱ्या कारवाई व्हावी.




