सोलापुरमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ झाला. सदावर्ते यांच्यावर मराठा आरक्षण आंदोलकांनी काळी शाई फेकली. आज सोलापुरमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते पत्रकार परिषद घेत होते, यावेळी त्यांच्या अंगावर शाईफेक झाली आहे. यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षण संदर्भात घोषणा दिल्या आहेत.
यावेळी वकील सदावर्ते यांनी आंदोलकांचा निषेध केला. अशा शाईफेक हल्ल्यांना मी घाबरत नसल्याचे सदावर्ते म्हणाले. ही शाईफेक संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली.
‘मी संवीधानाची भाषा बोलतो म्हणून मला टारगेट केले जात असल्याचा यावेळी सदावर्ते यांनी आरोप केला. काल उस्मानाबादमध्ये स्वतंत्र मराठवाडा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा संघटनांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते.
या शाईफेकीला विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोपही सदावर्ते यांनी केला आहे. तसेच काही पोलिसांनी हाताशी धरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा हा डाव आहे, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.



