पुणे, दि. 7 – तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशलगतच्या किनारपट्टीवर येणाऱ्या चक्रीवादळाचा परिणाम राज्याच्या हवामानावर होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात शुक्रवार नंतर कोकम, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आग्नेय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे. चक्रीवादळ आठ डिसेंबरपर्यंत तामिळनाडू, पॉडिचेरी आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीपर्यंत पोहचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. चक्रीवादळाला संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशाने चक्रीवादळाला “मॅनडस’ हे नाव दिले आहे. चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील काही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील हवामानावर होणार आहे. मध्यमहाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात बाष्प वाहून येईल. या बाष्पाच्या प्रभावाने राज्यातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बुधवारी विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक कमी 13.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 34.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात किमान 14 आणि कमाल 31 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.



