पुणे, दि. 7 – शिक्षण सेवकांचा कालावधी संपत आलेल्या 170 जणांच्या कागदपत्रांची जिल्हा परिषदेकडून तपासणी पूर्ण झाली आहे. मात्र, त्यामधील अकरा शिक्षण सेवक गैरहजर राहिले आहेत. या कागदपत्रे छाणणीला सोमवारी सुरूवात झाली होती. त्याचा अहवाल दि. 12 तारखेपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.
प्राथमिक शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या टीईटी घोटाळ्याशी संबंधित असलेल्या जिल्ह्यातील 170 शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली होती. 170 मध्ये आणखी अकरा शिक्षकांची भर पडली असून ही संख्या आता 181 वर पोहोचली आहे. मात्र, पूर्वीच्या 170 मधील 11 शिक्षक प्रमाणपत्र सादर करण्यास उपस्थित राहिले नाहीत. पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती झालेल्या शिक्षकांची नोकरी कायम राहील. पुणे जिल्हा परिषदेने टीईटी घोटाळ्याशी संबंधित आणि तीन वर्षाचा नियमित शिक्षण सेवकांचा कालावधी संपलेल्या शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी जिल्हा परिषदेने केली आहे.
टीईटी घोटाळा उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या घोटाळ्यात अनेकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर करून ही परीक्षा पास करत नोकरी मिळवली होती. राज्य परीक्षा विभागाने 8 हजार उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली होती. यातील पुण्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षण सेवक, उपशिक्षक असणाऱ्या शिक्षकांची यादी शिक्षण विभागाला मिळाली असून या शिक्षकांच्या या शिक्षण सेवकांच्या मूळ कागदपत्रे तपासनी करण्यात आली आहे.




