माजी सहकार मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर यांची राजकीय कर्मभूमी आणि विद्यमान लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा बालेकिल्ला असलेल्या उंडाळे जिल्हा परिषद गटात येळगाव व मनू या दोन ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार आहे पाच ग्रामपंचायत पैकी तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांची राजकीय कर्मभूमी असलेल्या या जिल्हा परिषद गटावर मागील ५० वर्षे स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांचे वर्चस्व राहिले. स्व. पाटील यांच्या निधनानंतर रयत कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील हे या गटाचे नेतृत्व करत आहेत. या गटातील विविध संस्था व ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्याच गटाची सत्ता आहे. उंडाळे विभागात येळगाव, गणेशवाडी, घरळवाडी, हनुमंतवाडी, मनू या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून यामध्ये तीन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत. येळगाव व मनू या दोन ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची होत असून या दोन्ही गावात दुरंगी सामना होणार आहे. इतर तीन ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत… येळगाव येथे कराड पंचायत समितीच्या माजी सभापती फरीदा इनामदार यांचे पती विद्यमान सरपंच मन्सूर इनामदार हे श्री येळोबा रयत विकास आघाडीचे नेतृत्व करत असून ते स्वतः निवडणुकीत उमेदवार ही आहेत. याशिवाय सरपंच पदासाठी महिला आहे. दोन्ही परस्परविरोधी पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार एकाच भावकीतील असल्यामुळे चांगलीच राजकीय रणधुमाळी पहावयास मिळत आहे. या ठिकाणी ११ सदस्य व एक सरपंच अशा १२ जागांसाठी निवडणूक होत असून विरोधकांमुळे उंडाळकर गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.



