देशभरात संवेदनशील बनलेला लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्यासाठी आणि तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ पाटण तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्यावतीने मंगळवारी पाटण येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आ. नितेश राणे म्हणाले पाटण तालुक्यात हिंदू भगिनीवर झालेल्या अत्याचाराची घटना निंदनीय आहे. आज राज्यभर सर्वत्र लव्ह जिहाद तसेच धर्मांतरविरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू बांधव रस्त्यावर उतरले आहेत. हिंदू भगिनींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढले जात आहे. श्रद्धासारख्या हिंदू मुलीची हत्या करून तिचे तुकडे तुकडे केले ही घटना समस्त हिंदू समाजासाठी चीड आणणारी असून यासाठी हिंदू समाजातील भगिनींच्या रक्षणासाठी आमचे सरकार खंबीर आहे.
यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचे भाषण झाले. यावेळी तहसिलदार रमेश पाटील यांना हिंदू भगिनींनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चा दरम्यान पाटण पोलिसांकडून मोर्चा मार्गावर तसेच शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुठेही अनुचित प्रकार न घडता मोर्चा शांततेत पार पडला.



