सोलापूर : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला सोलापुरात जबर धक्का बसला आहे. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ सोलापूर उपजिल्हाप्रमुख मनोज पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेनेत प्रवेश करताना मनोज पवार यांनी शिंदे गटाच्या सोलापुरातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्कलकोट तालुक्यातील या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. आता हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परतले आहेत.
शिंदे गटाचे (बाळासाहेबांची शिवसेना) उपजिल्हाप्रमुख मनोज पवार यांनी आज शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. शिंदे गटासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते असे एकूण २१ जणांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्यासह शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.



