कराड तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक मागील महिन्यात जाहीर झाली होती. त्यापैकी सात ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत. चार ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाले असून उर्वरित ३३ ग्रामपंचायतीसाठी तालुक्यातील १३१ मतदान केंद्रावर रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यात सरपंच पदाच्या २९ जागांसाठी तर सदस्य पदाच्या २६७ जागांसाठी सकाळपासून मोठी चुरस पहावयास मिळाली. तालुक्यातील वडगाव हवेली, आटके यासारख्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या गावात सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी रांगा लावण्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
कराड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळी तालुक्यातील ५४ हजार ८४६ ग्रामस्थांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी सुमारे ८३.१४ इतकी आहे. तालुक्यातील २८ हजार ६६३ पुरुष तर २६,१८३ महिला मतदारांनी मतदान केले असून ९० सरपंच पदाच्या उमेदवारांसह ६८५ सदस्य पदाच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.



