
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल’ आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच सरकार उलथवून टाकण्यासाठीच अण्णा हजारेंनी जनलोकपाल आंदोलन केलं, असा गंभीर आरोप केला. “तेव्हा आंदोलन करणारे अण्णा हजारे आज एवढे प्रश्न आहेत, पेच निर्माण होत आहेत, पण त्यावर चकार शब्द बोलत नाहीत,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी अण्णा हजारेंवर निशाणा साधला. त्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत शरद कोळीही होते. गुरुवारी (३ नोव्हेंबर) चोपडा येथे सभेसाठी आले असताना सुषमा अंधारे पत्रकारांशी बोलत होत्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “हो, अण्णा हजारेंमुळेच भाजपा सत्तेत आली. त्याबाबत मी शास्त्रशुद्ध मांडणी केलीय. अण्णा हजारे लोकपालाची जी मांडणी करतात ती मागणीच मुळात संवैधानिक चौकटीच्या बाहेरची आहे. आपल्याकडील संसदीय लोकशाही मोडीत काढून अध्यक्षीय लोकशाही आणण्याचाच तो एक प्रयत्न होता. त्यातील त्रुटी कधीच दाखवण्याचा प्रयत्न झाला नाही.”



