- सदनिका विक्रीची सोडत ते ताबा प्रक्रिया संपूर्णतः ऑनलाईन
मुंबई, ३० डिसेंबर :- म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या सदनिकांची विक्री करण्यासाठी म्हाडाने आपल्या संगणकीय सोडत प्रणालीत महत्वपूर्ण बदल केले असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही सोडत प्रक्रीया आता पूर्णपणे मानवी हस्तक्षेपविरहीत करण्यात आली आहे. त्यामुळे सोडत आज्ञावली अधीक पारदर्शक, सुलभ आणि सुरक्षीत झाली आहे. सदनिकेसाठी अर्ज करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रीया आता ऑनलाईन करण्यात आली आहे.
म्हाडाच्या राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीकरिता ILMS 2.0 (Integrated Lottery Management System) ही नूतन संगणकीय सोडत प्रणाली तयार करण्यात आली आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही प्रक्रीया हाताळली जाणार आहे, यामध्ये नागरिकांकडून डीजीटल स्वरूपात सादर करण्यात आलेली माहिती व कागदपत्रे जतन करून ठेवली जातील. या जतन केलेल्या माहिती मध्ये कोणी जाणीवपूर्वक हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास सहज लक्षात येऊ शकेल. स्वयंचलित ब्लॉकचेन प्रणाली दर दहा मिनीटांनी स्वतःला अपडेट करत राहते, त्यामुळे यामध्ये साठवलेली माहिती मानवी हस्तक्षेपविरहित आणि सुरक्षित राहण्यास मदत होते. या प्रणालीची सर्वात महत्वाची बाब म्हणजे नागरिकांना सोडतीत सहभाग घेण्याकरिता नोंदणी प्रक्रिया अमर्याद खुली राहणार आहे. अर्जदारास नोंदणी करताना एक युनिक क्रमांक प्राप्त होणार आहे. त्यामुळे अर्जदार आपल्या वैयक्तिक माहितीमध्ये झालेल्या बदलांची नोंद अर्जात कधीही करू शकतात. अशाप्रकारे नोंदणीकरण प्रक्रियेत सर्व कागद पत्रांची पूर्तता झाल्यानंतर अर्जदार हे म्हाडाचे सदनिका विक्रीच्या सोडतीतील पात्र उमेदवार ठरतील व अर्जदाराचे स्वतंत्र कायमस्वरूपी प्रोफाइल तयार होणार आहे.
मात्र अर्जदारांनी त्यांचे प्रोफाईल वेळोवेळी अद्ययावत ठेवणे गरजेचे असेल. भविष्यात केव्हाही म्हाडाची सोडत जाहीर झाल्यानंतर अर्जदारास इच्छुक सदनिके करिता अनामत रक्कमेचा भरणा करून सोडतीत सहभाग घेता येणार आहे. तसेच सोडतीत सदनिका प्राप्त झालेल्या यशस्वी अर्जदारांची माहिती देखील या प्राणालीत जतन केली जाणार आहे. अशा अर्जदारांनी सोडत प्रक्रियेत पुन्हा अर्ज करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा अर्ज प्रणालीतून रद्द होऊन त्यांना तात्काळ याबाबतची माहिती तुमच्या भ्रमणध्वनीवर संदेशाद्वारे दिली जाणार आहे.
नवीन संगणकीय सोडत प्रणाली म्हाडासाठीच नव्हे तर नागरिकांसाठी देखील एक पर्वणी ठरणार आहे कारण अर्जदारांच्या अर्जाची अचूक पडताळणी या प्रणालीद्वारे त्वरित होणार आहे. सोडतीत सहभाग घेण्याकरिता आवश्यक असलेल्या नोंदणीकरण प्रक्रियेदरम्यान नागरिकांकडून चेकलिस्ट नुसार कागदपत्रांची मागणी केली जाणार आहे, ज्यामुळे अर्जदारांची पात्रता सोडतीच्या आधीच निश्चिती होणार असून या प्रणाली ने पात्र ठरविलेले अर्जदारच सोडतीत सहभाग घेऊ शकतील. तसेच प्रचलित पद्धतीनुसार पात्रता निश्चिती करिता २१ कागदपत्रे विंजेत्या अर्जदारांकडून मागविण्यात येत होती मात्र नवीन प्रणाली अंतर्गत केवळ ७ प्रकारची कागदपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. यामधील शपथपत्र, स्वयंघोषणापत्र तसेच स्वीकृतीपत्र यांची निर्मिती संगणकीय प्रणालीद्वारेच केली जातील व अर्जदाराच्या आधार इ-सिग्नेचर द्वारे त्यावर स्वाक्षरी घेण्यात येणार आहे. ILMS 2.0 प्रणाली शासनाच्या विविध डेटाबेस सोबत जोडली जाईल ज्यामध्ये डिजिलॉकर , महा-ऑनलाईन , इनकम टॅक्स, आधार, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र तसेच पीएमएवाय यांच्या एपीआय चा वापर करून अर्जदाराच्या कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन पद्धतीने त्वरित करण्यात येईल. सर्व कागपत्रांची पूर्तता होऊन अर्जदाराची पात्रता निश्चिती झाल्यानंतर, सोडतीतील विजेत्यांना देकार पत्र देखील ऑनलाईन पद्धतीने देण्यात येईल.
प्रचलित पद्धतीनुसार सोडतीपासून पात्रता निश्चिती ते प्रत्यक्ष ताबा देण्याच्या प्रक्रियेमध्ये मनुष्यबळ आणि अंदाजित एक वर्षाचा कालावधी लागत असतो आणि न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये ८ ते १० वर्ष अथवा अधिक कालावधी लागत असतो. मात्र नवीन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून अर्जदाराने निर्धारित सर्व कागदपत्र आज्ञावलीमध्ये अपलोड केल्यास अर्जदाराची पात्रता निश्चिती मानवी हस्तक्षेपा शिवाय विना विलंब होणार असल्यामुळे कामकाजामध्ये पारदर्शकता येणार आहे. प्रचलित पद्धतीमधील पात्रता निश्चितीकरिता लागणारे प्राधिकृत अधिकारी आणि अपील अधिकारी यांचे मनुष्यबळ आणि वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच कामकाजामध्ये पारदर्शकता, गतिमानता आणि किमान न्यायालयीन दांव्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल.
सुमारे सन २००० पासून परंपरागत मानवीय सोडत प्रक्रियेची कात टाकत, म्हाडाने सदनिका विक्री करिता पारदर्शक संगणकीय सोडतीचा वापर केला. या संगणकीय सोडतीच्या पारदर्शकतेवर अवघ्या महाराष्ट्राचा विश्वास संपादन केला आहे. बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता पुन्हा एकदा अत्याधुनिक तंत्रज्ञान व आज्ञावलीचा वापर करून म्हाडाची नूतन संगणकीय सोडत प्रणाली सर्वसामान्य नागरिकांकरिता सहज हाताळण्यायोग्य, सुटसुटीत, सुलभ, सोपी आणि संपूर्णतः ऑनलाईन करण्यात आली आहे.
Vaishali Gadpale
CPRO/MHADA



