वॉशिंग्टन – कोरोनापश्चात जगभरातील अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली आहे. यामध्ये ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉननचाही समावेश आहे. अॅमेझॉनने नोव्हेंबर महिन्यात १० हजार कपातीची घोषणा केली होती. आता १८ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अनिश्चित अर्थव्यवस्थेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
Amazon चे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅण्डी जेसी यांनी यासंदर्भात पत्र लिहिले आहे. एकूण कर्मचारीसंख्येपैकी ६ टक्के कपात केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अॅमेझॉनमध्ये ३ लाख कॉर्पोरेट कर्मचारी (कायम तत्त्वावर) आहेत, तर संपूर्ण जगभरात १५ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी अॅमेझॉनसाठी काम करतात.
महागाई वाढली ग्राहक घटले
जगभरात महागाईने उच्चांक गाठला आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होत आहे. ग्राहकांकडून खर्चात कपात केली जात असल्याने कंपन्यांचा नफा कमी झाला आहे. यामुळे Amazon ने नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे.
अॅण्डी जेसी यांनी लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, ई-कॉमर्स स्टोअर, अॅमेझॉन फ्रेश आणि अॅमेझॉन गो, पीएक्सटी (People, Expreriance And Technology) विभागात ही कपात करण्यात येणार आहे. Amazon सध्या अनिश्चित अर्थव्यवस्थेतून जाणार आहे. तसंच, पुढेही हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कपात करण्यात आली आहे.
कंपनीतून १० हजार नोकरकपात केली जाणार असल्याची घोषणा कंपनीकडून नोव्हेंबर महिन्यांत करण्यात आली होती. मात्र, आता १८ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी काढण्यात येणार असल्याचे जेसी यांनी स्पष्ट केले आहे. १८ जानेवारीपासून याबाबत कार्यवाही सुरू होऊ शकते. अॅमेझॉनमध्ये अशाप्रकारची मोठी कपात होणार असल्याची माहिती त्यांच्या सहकार्याने फोडली. त्यामुळे ही माहिती तत्काळ जाहीर करावी लागली, असंही जेसी म्हणाले.



