पुणे – थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे उष्ण असलेली बाजरी खाण्यास नागरिकांकडून पसंती देण्यात येत आहे. त्यातच ज्वारीच्या तुलनेत बाजरीचे भाव कमी आहेत. परिणामी, मागील काही दिवसात बाजरीला मागणी वाढली असल्याची दिसून येत आहे.
पुण्यातील मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज 70 ते 80 टन बाजरी आवक होत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा बाजरीची आवक कमी होत आहे. यंदा मागणी वाढली असली तरी उत्पादन कमी झाल्याने किरकोळ बाजारात दर्जानुसार बाजरी प्रतिकिलो 30 ते 40 रुपयांना विकली जाते आहे. दरम्यान महाराष्ट्र, राजस्थानात झालेल्या अवेळी पावसामुळे बाजरीच्या प्रतवारीवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू झाल्यानंतर बाजरीच्या मागणीत वाढ होते. बीड, गेवराई भागांतील ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने पश्चिम महाराष्ट्रात वास्तव्यास येतात. त्यांच्याकडून बाजरीला मोठी मागणी असते. त्यामुळे बीड, गेवराई, शेवगाव, पाथर्डी, मंचर, केडगाव, सुपा, नाशिक येथील व्यापारी बाजरीची मोठी खरेदी करतात. त्याच बरोबर सध्या ग्रामीण भागातील नागरिक शहरात मोठ्य प्रमाणात राहत असल्याने थंडीच्या दिवसांत आवडीने बाजरीची खरेदी केली जाते.



