पुणे – राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाला प्रासंगिक करारामधून डिसेंबर महिन्यात एक कोटी 67 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या प्रासंगिक करारामध्ये शैक्षणिक सहली व लग्न समारंभाचा समावेश आहे. पुणे विभागाने डिसेंबर महिन्यात प्रासंगिक करारांद्वारे 996 बस भाड्याने दिल्या होत्या.
तिकीट विक्री हे एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यानंतर एसटीला उत्पन्नाचे साधन म्हणून शैक्षणिक सहली, लग्न समारंभ, वेगवेगळ्या संस्थांचे कार्यक्रम, कंपन्यांच्या सहलींसाठीही एसटी बस भाड्याने दिली जाते. त्यामधूनही एसटीला उत्पन्न मिळले.
नोव्हेंबरनंतर लग्न समारंभ आणि शैक्षणिक सहली सुरू होतात. त्यामधून एसटीला अतिरिक्त उत्पन्न मिळते. पण, गेल्या काही वर्षांत करोना आणि कामगारांच्या संपामुळे एसटीचे उत्पन्न घटले होते. मात्र, यंदा पुन्हा प्रासंगिक करार वाढल्यामुळे एसटीचे उत्पन्नात भर पडली आहे.
यंदा डिसेंबर महिन्यात एसटीला प्रासंगिक करारातून अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. एसटीच्या पुणे विभागाकडून डिसेंबर महिन्यात 996 प्रासंगिक करार करण्यात आले होते. त्यामध्ये सर्वाधिक शैक्षणिक सहलींचा समावेश आहे. या कारारांद्वारे एसटी पाच लाख 20 हजार 782 किलोमीटर धावली आहे. त्यामधून एकसीला एसटीला एक कोटी 67 लाख 57 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.




