मुंबई : सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान करणारे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा नव्याने वादग्रस्त विधान करून नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील सध्या एका नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. आपला कुठलाही देव आणि महापुरुष बॅचलर नाही असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यातील नव्या वादाला तोडं फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुण्यात राष्ट्रीय युवा दिवस निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी एक विधान केलं आहे ज्यामुळे नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. यापूर्वीही चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती शाई फेकण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. ते प्रकरण शांत होत असताना आता नव्या वादाला तोंड फुटणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?आपला कुठलाही देव बॅचलर नाही. आपले कुठलेही महापुरुष बॅचलर नाही. संसार करुन सगळं करता येतं. सेवा देखील करता येते. जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याच रक्त हिरवं किंवा निळं नाही. परमेश्वराने कुठलाच भेद केला नाही. सगळ्यांना कॉमन करुन त्याने पाठवलं. सगळ्यांना दोन डोळे दोन कान आणि समान शरीर देवाने दिले आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.



