पुणे : पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण होणार हे आज समजणार आहे. यामध्ये मॅट विभागात शिवराज विरुद्ध हर्षवर्धन तर माती विभागात सिकंदर विरुद्ध महेंद्र यांच्यात लढत होणार आहे.
मानाच्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीमध्ये मॅट विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात होणार आहे. तर माती विभागातील अंतीम लढत सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात होणार आहे. या दोन्ही लढतीकडं आज सर्वाचं लक्ष लागलं आहे.
आज संध्याकाळी आधी अनुक्रमे मॅट आणि त्यानंतर माती विभागातील दोन अंतीम लढती खेळवण्यात येणार आहेत. यातील विजेत्यामधून महाराष्ट्र केसरीची अंतीम लढत खेळवण्यात येईल. नांदेडचा शिवराज राक्षे हा यावेळच्या महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. दुखापतीतून सावरत शिवराजने मॅट विभागाची अंतीम लढत गाठली आहे. इथे त्याची लढत 2019 चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याच्याशी होणार आहे. यावेळी महाराष्ट्र केसरीची गदा घ्यायचीच या इराद्याने आपण आखाड्यात उतरत असल्याच शिवराजने म्हटलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी महाराष्ट्र केसरीसाठी मेहनत घेत आहे. त्यामुळं आता यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा घ्यायची असा मी निश्चय केला असल्याची माहिती नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे याने दिली.
कोणी कोणाला केलं पराभूत
पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे. यातील अंतिम लढती आज होणार आहेत. दरम्यान, काल झालेल्या लढतीत मॅट विभागातील पहिल्या उपांत्य लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने पुण्याच्या तुषार दुबे याचा पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत वाशीमच्या सिकंदर शेख याने बुलढाण्याच्या बालारफिक शेखचा पराभव करून माती विभागातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रवेश केला आहे. गादी गटातील दुसऱ्या उपांत्य लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने पुण्याच्या गणेश जगताप याचा पराभव करुन अंतिम लढतीत धडक मारली आहे. गादी विभागाची अंतिम लढत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात होणार आहे. या दोघांमधील विजेता महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत पोहचेल. तर माती विभागातील अंतीम लढत सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात होणार आहे. या दोघांमधील विजेता महाराष्ट्र केसरीतील अंतीम फेरीत पोहोचेल.



