पुणे, दि. 19 – उच्च शिक्षण संस्थांतील साधन सुविधांचा पुरेपूर वापर करण्याच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिल्या आहेत. त्या अंतर्गत उच्च शिक्षण संस्थांतील प्रयोगशाळा, ग्रंथालय, साधने आदी स्रोतांचा वापर अन्य उच्च शिक्षण संस्थांनाही करणे शक्य होणार आहे. सामायिक वापरातून संयुक्त संशोधनाला चालना मिळणार आहे.
यासंदर्भात “यूजीसी’ने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. केंद्र सरकारकडून केंद्रीय विद्यापीठे आणि अन्य उच्च शिक्षण संस्थांना योग्य दर्जाचा पायाभूत सुविधा आणि स्रोत निर्माण करण्यासाठी मदत केली जाते. त्यातून संशोधन आणि विकास क्षेत्रात गुणवत्तापूर्ण काम होणे अपेक्षित आहे. या साधन सुविधांच्या देखभालीसाठी सातत्याने निधी उपलब्ध करून द्यावा लागतो. या पार्श्वभूमीवर त्याचा पुरेपूर वापर होण्यासाठी उपलब्ध साधनसुविधा अन्य उच्च शिक्षण संस्थांना नाममात्र दरात उपलब्ध करून देण्याच्या सूचना यूजीसीने दिल्या. याद्वारे अन्य संस्थांना साधने उपलब्ध होण्यासह यजमान संस्थेला साधनांच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध होऊ शकणार आहे.
पदवीपूर्व, पदव्युत्तर पदवी आणि संशोधन स्तरावर दोन संस्थांमध्ये स्रोतांचा सामायिक वापर करता येईल. त्यासाठी संस्थांना सामंजस्य करार करावा लागणार आहे. मात्र ना नफा ना तोटा तत्त्वावर केवळ खर्चावर आधारित शुल्क आकारावे लागेल, असेही “यूजीसी’ने स्पष्ट केले आहे.




