नवी दिल्ली – जगभरात मंदीचे सावट तीव्र होत असून, अनेक दिग्गज कंपन्या विशेषतः माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रातील कंपन्या हजारोंच्या संख्येने कर्मचारी कपात करत आहेत. त्या तुलनेत भारतात परिस्थिती चांगली असली, तरी आयटी कंपन्यांमध्ये होणाऱ्या भरतीचे प्रमाण घटले आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएल टेक या चार बड्या आयटी कंपन्यांनी मिळून डिसेंबर २०२२ ला संपलेल्या तिमाहीत केवळ १९४० कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. गेल्या ११ तिमाहींमधील ही सर्वांत कमी भरती आहे. जगभरातील वाढत्या आर्थिक अस्थिरतेमुळे आणि भू-राजकीय तणावामुळे तंत्रज्ञान सेवांची मागणी घटत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे नव्या कर्मचारी भरतीवर नकारात्मक परिणाम झाला आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएल टेक या देशातील चार मोठ्या आयटी कंपन्यांनी गेल्या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीअखेर एकूण ६१,१३७ कर्मचाऱ्यांची वाढ नोंदवली होती. कोविड-१९ साथीमुळे डिजिटायझेशनची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी या कंपन्यांमध्ये कर्मचारी भरतीत जोरदार स्पर्धा झाली होती.गेल्या ११ तिमाहींमध्ये आघाडीच्या या चार आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी नियुक्ती वाढली होती, मात्र त्यानंतर आता त्यात केली जात असलेली घट, बदलत्या तंत्रज्ञानाचा कल दर्शविते, असे या क्षेत्रातील विशेषज्ञ कमल कारंथ यांनी म्हटले आहे.



