मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून लढण्याचं आव्हान देत आहेत. त्यामुळे राजकीय आव्हान प्रतिव्हानं देण्यास सुरुवात झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं असलं तरी आदित्य ठाकरे हे वरळीतून कसे निवडून आले याचा गौप्यस्फोटच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे पराभूत होतील म्हणून शिवसेना विरोधकांना घाबरली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा विजय सोपा व्हावा म्हणून सचिन अहिर यांना शिवसेनेत घेण्यात आलं, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. केसरकर यांच्या या दाव्यावर अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून लढण्याचं आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्री शिंदे हे तरुणाला घाबरले असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विचारण्यात आलं असता त्यांनी वेगळाच गौप्यस्फोट करून ठाकरे गटाचा पर्दाफाश केला.
तरुणाला कोणीही घाबरत नाही. एक तर आदित्य ठाकरे यांना निवडणुकीला उभं केलं. तेव्हा ते विरोधकांना घाबरले. सचिन अहिर यांना विनंती करून आपल्या पक्षात घेतलं. त्यानंतर उमेदवारी भरू नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला. त्यानंतर त्यांना आमदार केलं. हा सर्व इतिहास आहे. पडताळून पाहा, असा दावा दीपक केसरकर यांनी केला.



